आनंददायी शिक्षणाच्या पद्धतींचा उच्च प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासावर परिणाम
DOI:
https://doi.org/10.7492/fh8k3925Abstract
आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतींमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले जात आहे. बौद्धिक ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांच्या सामाजिक, मानसिक, भावनिक आणि शारीरिक विकासावरही लक्ष दिले जात आहे. या संदर्भात, आनंददायी शिक्षण पद्धती एक प्रभावी उपाय म्हणून समोर आली आहे. “आनंददायी शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देण्यावरच लक्ष केंद्रित केले जात नाही, तर त्यांना त्यांच्या रुचीनुसार शिकवले जाते, ज्यामध्ये खेळ, गटकार्य, संवादात्मक उपक्रम आणि परस्परसंवादी शिक्षण पद्धतींचा समावेश होतो. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंद निर्माण होतो, आणि त्यांना शिकताना मनःशांती आणि उत्साह अनुभवला जातो.”(पाटील, 2007) संशोधनाचा मुख्य उद्देश म्हणजे आनंददायी शिक्षण पद्धतींचा विद्यार्थ्यांच्या सामाजिक कौशल्यांवर होणारा परिणाम तपासणे. आंबेगाव तालुक्यातील 50 उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांचा नमुना घेऊन या पद्धतींचा प्रभाव मोजला गेला. सामाजिक कौशल्ये म्हणजे विद्यार्थ्यांची संवाद साधण्याची क्षमता, सहकार्याची भावना, समस्या सोडवण्याची क्षमता आणि इतरांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता. उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांमध्ये या कौशल्यांचा विकास महत्त्वपूर्ण आहे, कारण हा वयाचा टप्पा त्यांच्या सामाजिक व मानसिक विकासासाठी अत्यंत संवेदनशील आहे. संशोधनात विद्यार्थ्यांना विविध आनंददायी शिक्षण पद्धतींचा अनुभव देण्यात आला. त्यांना गटकार्य, संवाद साधणे, खेळ, परस्परसंवादी गेम्स, आणि इतर शालेय उपक्रमांद्वारे शिकवले गेले. विद्यार्थ्यांचे सामाजिक कौशल्य मोजण्यासाठी 20 विधानाची पदनिश्चयनश्रेणी तयार केली गेली, ज्यामध्ये आत्मविश्वास, संवाद कौशल्य, सहकार्य आणि समस्या सोडवण्याची क्षमता मोजली गेली. “सांख्यिकीय विश्लेषणाचा वापर करून, यातील t-test आणि स्पीअरमन रँक कोरिलेशन पद्धती वापरून या पद्धतींचा प्रभाव मोजला गेला. परिणामांनी दाखवले की आनंददायी शिक्षण पद्धती विद्यार्थ्यांच्या सामाजिक कौशल्यांवर सकारात्मक प्रभाव टाकतात. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासात वाढ, संवाद कौशल्यामध्ये सुधारणा, सहकार्याची भावना आणि समस्या सोडवण्याची क्षमता वाढलेली दिसून आली.”(गुप्ता, 2018). या संशोधनात प्राप्त झालेल्या निकालांनी आनंददायी शिक्षण पद्धतींचा वापर विद्यार्थ्यांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध केले आहे. तरी, या पद्धतींचा वापर इतर शाळांमध्ये, विशेषतः उच्च प्राथमिक स्तरावर वाढवला जावा; ज्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि समाजातील सहभाग वृद्धिंगत होईल. शिक्षकांना या पद्धतींचा वापर करताना विद्यार्थ्यांच्या सामाजिक कौशल्यांच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. या संशोधनाच्या निष्कर्षांद्वारे, आनंददायी शिक्षण पद्धतींचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याची शिफारस केली जाते, जे विद्यार्थ्यांच्या भावी जीवनाला सकारात्मक दिशा देऊ शकते.