मराठी साहित्यातील कवयित्रींच्या कवितेतील अभिव्यक्ती
DOI:
https://doi.org/10.7492/40mhh890Abstract
स्वातंत्र्योत्तर मराठी कवितेमागे सातशे वर्षाची समृध्द परंपरा आहे. कथा, किर्तन, पुराण, प्रवचन, भजन, भारूड, लळीत या संत साहित्याचे संस्कार तिच्यावर आहेत. लौकिक जीवनाच्या नव्या जाणिवांनी आधुनिक मुल्यनिधिष्ठतेची जागा घेतली. निसर्गातील तरल संवेदना, स्वातंत्र्य, समता, विश्वबंधुता या मुल्यांचे भान येऊन वैयक्तिक व सामाजिक भावना, तीव्र सौंदर्यलालसा, प्रेमपूजन, सामाजिक रूढीचा जाच, त्याविरूध्द बंडखोरी, दुरच्या भूतकाळाचे आकर्षण, गहिरी अनिर्वचनीय उदासीनता, गुढगुंजन आणि ध्येयपूजन इ. विशेष तत्कालीन समग्र मराठी कवितेने जपले.
स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील स्त्रियांच्या ओवीबध्द कविता स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर बदलताना दिसतात. कुलीन संवेदनशीलता आणि प्रणायिणी वळणाचा भाव त्यावेळच्या कवयित्रींनी आपल्या कवितेतून अधोरेखित केला. इंदिरा संत, शांता शेळके, संजीवनी मराठे, पद्मा गोळे आदी कवयित्रीनी त्या काळात भावकवितेसोबतच गीतरचनाही केली, इंदिरा संतांची कविता ही आत्मसंवादी, गुढत्ववादी तर कधी प्रियकराशी संवादी होताना जाणवते. अस्सल जीवनानुभवी शब्दकळा, चित्रमय शैली रेखीव रचनातंत्र यामुळे शांता शेळकेंची कवितादेखील विलक्षण लोकप्रिय झाली. कवीच्या तुलनेत स्त्रियांची कविता उत्कट भावनांचा आविष्कार करते. अनुभवविश्व समृध्द असल्यामुळे ती कुठेही अडखळताना दिसत नाही. व्यस्त होताना ती कवितेच्या कुठल्याही आकृतिबंधाचे बंधन पाळत नाही. तर सगळ्या काव्यप्रकाराची हाताळणी करते, अनेक वेळा आपल्या लेखणीतून मांडणीतून निरर्थक वाड्.मयीन संकेत मोडताना दिसते. बदलत्या संस्कृतीच्या परंपरेकडे नव्या दृष्टीने पाहण्याचे बळ या कवितेने दिले, १९८०-२००० या कालखंडातील एकूणच कवितेचे आकलन करताना असे लक्षात येते की आत्मनिष्ठे कडून समूहनिष्ठेकडे काव्यजाणिवांचा लंबक स्थलांतरित होत गेलेला दिसून येतो. स्त्री कवितेतून व्यक्तिलक्षी जाणिवा समूहलक्षी जाणिवेकडे समाजसन्मुख होत. सामाजिक जाणिवा प्रकट करू लागली. तिने व्यापक भूमिका अंगीकारली व्यापक अर्थघनता कवितेला प्राप्त झाली , साहित्य हे समाजजीवनाचे दर्पण असते, त्याचबरोबर भाषा ही जीवन जगण्याची पध्दती असते, या उक्तींचा अन्वयार्थ या कालखंडातील स्त्रीवादी कवितेने पचविला यातून नित्य नवे बदल कवितेतून आविष्कृत झाले. मला काही सांगायचे पण ते कसे सांगायचे? ही अभिव्यक्त होण्याची नवी पध्दत मराठी कवितेने स्वीकारली.