उर्मिला पवार यांचे वाङ्मयीन योगदान
DOI:
https://doi.org/10.7492/g6t95g86Abstract
स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यात अनेक साहित्य प्रवाह निर्माण झाले. त्यात ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, जनवादी साहित्य, आदिवासी साहित्य इत्यादी साहित्य प्रवाह निर्माण झाले. त्यातही कथा, कविता, कादंबरी, नाटक, आत्मचरित्र इत्यादी वाङ्मय प्रकार अधिक समृध्द बनलेले दिसतात. १९६० च्या आसपास मराठी साहित्यामध्ये आमुलाग्र बदल झालेला दिसतो. हा बदल साहित्याच्या प्रयोजनात आणि स्वरुपात झालेला दिसतो. त्यामुळे साहित्यात प्रकट होणाऱ्या आशयात, मांडणीत वास्तव जीवनाचा आविष्कार होऊ लागला.
या साहित्याच्या परिवर्तनाला महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांची वैचारिक जाणीव कारणीभूत असलेली दिसते. त्याचा परिणाम म्हणजे ग्रामीण साहित्य, दलित साहित्य निर्माण झाले. त्यामुळे मराठी साहित्याचा चेहरा मोहराच बदलला. या प्रकाराच्या साहित्य निर्मितीमुळे मराठी साहित्य कल्पनारम्यतेकडून किंवा रंजनात्मकतेकडून वास्तवतकडे वळले. गोंडस, लोभसपणा, प्रतिमा, प्रततीकांच्या भाषेऐवजी भीषण वास्तव साकार करणारी भाषा पुढे आली. आदर्श किंवा रोमँटिक विषयाऐवजी जीवनातील वास्तव प्रश्नच साहित्याचे विषय बनले. आत्मकथनाच्या प्रवाहात जे जगले, भोगले, जाणवले, त्याचे चित्रण करण्यावर भर दिला जाऊ लागला. त्यामुळे ग्रामीण, शहरी जीवनाचे चित्रण येऊ लगले. कांदबरीच्या क्षेत्रातही बनगरवाडी, टारफूला, पाचोळा, धग, माहिमची खाडी, सूड यासारख्या साहित्यकृती निर्माण झाल्या. या साहित्यकृतीतून वेगवेगळ्या भागातील आणि वेगवेगळ्या स्तरातील जीवनाचे चित्रण साहित्यात आले. तसेच समाजातील सामाजिक घटकांचे प्रतिबिंबही साहित्यात येऊ लागले. एकंदरीत साहित्याचे आशयक्षेत्र व्यापक बनले. दलित साहित्याने त्याच्यात मोलाची भर टाकली आणि मराठी साहित्याचे दालन समृद्ध केले.