स्त्री नाटककार - (प्रारंभापासून साल २००० पर्यंत)
DOI:
https://doi.org/10.7492/vx2rph03Abstract
भरतमुनींनी लिहिलेल्या नाट्यशास्त्र या ग्रंथाच्या सुरुवातीपासून आजपर्यंत काळाच्या विविध टप्प्यावर पडताळून पाहिले असता स्त्रीचे नाट्यक्षेत्रातील योगदान एका ठराविक मर्यादेच्या कक्षेत सामावले आहे असे लक्षात येते.
अगदी पोरवयात असताना सुद्धा भातुकलीचा खेळ समरसून खेळणारी आणि त्यातील नाट्य भरभरून अनुभवणारी प्रत्येक स्त्री स्वतःच्या मनाच्या पटलावर म्हणजे मनाच्या रंगभूमीवर तिच्या तिच्या पुरतं एक नाट्य खरंतर रंगवतच असते. आणि स्त्रीचे आयुष्य तिच्या वैयक्तिक ,सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक अवकाशात अनेकाविध आव्हान, अपेक्षा आणि तिचं अस्तित्व याला पदोपदी कवटाळत पेलतच पुढे जात असत.
मात्र तरीही नाटकाच्या अवकाशात तिच प्रत्यक्ष योगदान मात्र मर्यादितच दिसतं. मुळात भारतातील एकंदरीत सामाजिक स्थितीगतीचा शोध घेताना भारतीय समाज जीवनात स्त्रीचे स्थान दुय्यम होत, हे मान्य करायलाच हवं त्यामुळे स्त्रीच्या अंगात अगदी नैसर्गिकपणे असलेली सृजनशीलता आणि नाट्य निर्मितीच्या क्षमतेला साहित्य विश्वात सहजपणे स्वीकारले जाईल, अशा पद्धतीने वाव दिला गेला नाही हे वास्तवही नाकारून चालणार नाही. मात्र यावरून स्त्रीकडे सृजनशीलता नव्हती असे म्हणणे म्हणजे स्त्रीच्या सूक्ष्म जाणिवांचा पट नाकारण्यासारखे होईल.
नाट्य विश्वाचा अभ्यास करताना एकीकडे आपण लोकरंगभूमी हा नाट्य निर्मितीचा एक अविभाज्य भाग आहे असे मानतो. आपल्या सांस्कृतिक वाटचालीतही स्त्रियांचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नाट्यमय सृजन ठाई ठाई दिसते. अनेक ठिकाणी साजरे होणारे विविध सण, उत्सव, लोकगीते, प्रथा, रूढी ,परंपरा आणि त्या अनुषंगाने येत राहणारी लोकनाट्याची परंपरा याचा धांडोळा घेतला तरी ही गोष्ट सहजपणे जाणवते. अगदी सहजपणे डोळ्यासमोर येणाऱ्या काही रचना म्हणजे ओव्या असतील भजन असेल, निरनिराळ्या सण उत्सव प्रसंगी म्हटले जाणारी विधी गीते असतील त्यातही अनेकदा स्त्रियांच्या सृजनशीलतेचा प्रत्यय येत राहतो. अगदी भोंडल्याची गाणी, यामध्ये घरातील निरनिराळ्या नात्यांमध्ये उद्भवणारे ताणतणाव आणि गमतीजमती यातून नाट्य उभे करतच असतात स्त्रिया!
तसेच पारंपरिक ओव्यांचा अभ्यास केला तरी आपल्या माहेरचे गोडवे, सासरी होणारा जाच, नणंद भावजयांमधील संबंध, मातृप्रेम, भ्रताराचे कौतुक या सर्व विषयांमध्ये नाट्य ठासून भरलेले असते. मात्र त्याला ठराविक संहितेची चौकट नसल्याने त्याकडे नाट्य म्हणून बघितले जात नाही.
उदा. सासुरवाशीण सून रुसून बसली कैसी? यादव राया राणी घरासी येईना कैसी?
या भोंडल्याच्या गाण्यांमध्ये घरातल्या सुनेला अपेक्षित असणारा मान न मिळाल्यामुळे ती रुसून माहेरी गेल्याचे नाट्य रंगवले जाते.