बहिणाबाईं चौधरी यांच्या गाण्यातील तत्त्वज्ञान
DOI:
https://doi.org/10.7492/6vqbzk52Abstract
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बहिणाबाई चौधरींच्या कविता 'बहिणाईची गाणी' या पुस्तकाच्या माध्यमातून प्रकाशित झाल्या. बहिणाबाई या शिकलेल्या नव्हत्या. त्या निरक्षर असल्या तरी अडाणी नव्हत्या. याचा प्रत्यय त्यांच्या अनेक कवितेतून येतो. शिकलेलीच माणसं तात्विक, वैचारिक चिंतन करतात असं नाही, तर न शिकलेली माणसं देखील वैश्विक स्वरूपाचे चिंतन करू शकतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेकडे पाहता येईल.
जीवनाचं व जगण्याचं अर्थ आपल्या गाण्यातुन सांगणारी बहिणाबाई या एक परिपक्व कवयित्री होत्या. तत्त्वज्ञान हे अगदी सोप्या भाषेत व्यवहारातील उदाहरण देऊन सांगता येते हे बहिणाबाई चौधरी यांनी दाखवून दिले.
घरोट (जाते) या कवितेत त्या लिहितात,
"अरे घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पिठी
तसं तसं माझं गाणं
पोटातून येतं व्होटी "
(बहिणाईची गाणी, बहिणाबाई चौधरी, सुचित्रा प्रकाशन, मुंबई, पंधरावी आवृत्ती २०१०,पृष्ठ.१२६) पूर्वी ग्रामीण भागात जात्यावर दळलं जात होतं. जात्याला दोन पाळू असतात. त्या दोन पाळूमध्ये दाणे भरल्यानंतर पीठ तयार होते.हे दोन पाळू म्हणजे सुखदुःखाचे प्रतीक आहेत. दिवस-रात्र याप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःख येत असतात. माझी कविता सहज ओठातून पोटात येत असली तरी कवितेच्या निर्मितीमागे आनंद व वेदना असते.