मराठी कथासाहित्यातील वैदर्भीय लेखिकांची वाटचाल व योगदान
DOI:
https://doi.org/10.7492/6tmwf590Abstract
कथा हा समृद्ध व लवचिक असा वाड्.मयप्रकार असून कादंबरीपेक्षा त्याचा अवकाश कमी असतो. त्यामुळे विदर्भातील लेखिकांनी कादंबरीपेक्षा कथा ह्या वाड्.मय प्रकारात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आहे. अरूणा पवार चवरे यांनी ‘वैदर्भीय स्त्रीकथा’ अशा दोन भागात प्रातिनिधिक कथासंग्रहाचे संपादन करून प्रसिद्ध केले आहे. दुसऱ्या खंडाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिले आहे की, “वऱ्हाडी भाषेतील मोलमजुरी करणारी स्त्रीदेखील स्वाभिमानाने जगत असते. ह्यावर प्रकाश टाकणारी ‘डॉ. प्रतिमा इंगोले’ यांची वऱ्हाडी भाषेतच संयुक्त कुटुंबव्यवस्थेतील ‘सासुबाई गुनाची लई’ एका कणखर स्त्रीची कथा आहे. ‘रत्ना बऱ्हाणपुरे’ यांची कथा लक्षवेधी आहे.तसेच स्त्रीलाही भावभावना असतात. तिच्याकडे माणूस म्हणून पहायला हवे. ह्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘पुष्पा काणे’ यांची ‘बहुतांच्या कार्यास यावे’, ‘डॉ. सुनिता काळे’ यांची ‘स्वाहा’, ‘उषकिरण आत्राम’ यांची ‘सखी’, ‘लक्ष्मीकमल गेडाम’ यांची ‘कलंकभोग’, ‘अमिता गहलोद’ यांची ‘असोसी’ या सर्व कथा. तर जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा सुरेल मिलाप सांगणारी डॉ. दमयंती पांढरीपांडे यांची ‘हेमलॉकचा पेला’ व्यावसायिक वातावरणातही संस्कार जपणारी ‘हेमलता जोहरापुरकरांची’ ‘पाथेय’. सणउत्सव कुठल्याही संस्कृतीचे असोत. त्यातील विचार एक असू शकतो, हे सांगणारी ‘हेमा नागपुरकरांची’ ‘व्हॅलेंटाईन’. एकीकडे मैत्रीचे स्थान दर्शविणारी ‘मृदगंध’ ही ‘अरूणा पवार-चवरे’ यांची भावनात्मक ओलावा देणारी कथा तर दुसरीकडे स्वार्थाने बरबटलेली माणसे कुठल्या स्तरावर जाऊन जगत असतात, हे सांगणारी ‘ज्योती मोहन पुजारी’ यांची ‘माणसाचा मुडदा,’ कौटुंबिक जिव्हाळ्याची व्यथा बोलकी करणारी ‘विजया ब्राह्मणकर’ यांची ‘आई अगं हस न्’, मायभूमीचं अलौकिक प्रेम दर्शविणारी, भारतीय संस्कृती उराशी कवटाळून जगणारी ‘कलावती’. देशप्रेम देशप्रेमच आहे हे सांगणारी सौ. प्रतिभा कुलकर्णी यांची ‘मायग्रेषन’, एका समर्थ व्यक्तित्वाचा समर्थपणे आढावा घेणारी डॉ. ‘श्रद्धा पराते’ यांची ‘पोट्रेट’ अशा विविध विषय समावेशक खंड-२ मधील एकापेक्षा एक सरस कथा रसिकांना निश्चितच आवडतील.”१
अर्थातच विदर्भातील लेखिकांना त्यांच्या सशक्त लेखनीने कथावाड्.मय समृद्ध केले आहे; म्हणून ‘वैदर्भीय स्त्रीकथा’ खंड १ च्या यशस्वी वाटचालीनंतर अरूणा पवार यांनी ‘वैदर्भीय स्त्रीकथा’ खंड २ चे संपादन केले. त्याहीवेळी त्यांना वैदर्भीय लेखिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी कथांच्या विषयाचे कुठलेच बंधन न ठेवल्याने विविध विषयांवरी कथांची ओळख वाचकांना त्यातून होते. अशा काही कथा लेखिकांची आणि त्यांच्या कथांची ओळख याठिकाणी करून देता येईल.