२१ व्या शतकातील भारतीय महिला उद्योजक : एक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/0gbzd051Abstract
भारतीय अर्थव्यवस्था ही अनेक घटकांवर आधारित आहे. या प्रमुख घटकांवर देशाचा आर्थिक विकास अवलंबून असतो. भारत देश महासत्ता होणार याविषयी अनेक तज्ञ, विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकीय नेते अंदाज व्यक्त करत आहेत. आणि या दृष्टीने विविध स्तरावर देशात नियोजन करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. मात्र त्यामध्ये महिलांच्या रूपात जवळपास ५० टक्के प्रमाण असलेल्या कर्तुत्ववान मानवी श्रमाचा उपयोग देशाच्या विकास प्रक्रियेत केला तर उद्योजकता आहे असे म्हणता येईल. महिलांना स्वातंत्र्य, समान संधी देण्याच्या फक्त गप्पागोष्टी न करता प्रत्यक्ष कृतीत उतरवणे आवश्यक आहे. यादृष्टीने समाज, गाव, राज्य, देशाच्या व्यवस्थेचा विचार करण्यापेक्षा समाजातील कुटुंब प्रमुखांनी आपल्या कुटुंबातील महिलांना आणि त्यांच्या कर्तुत्वाला वाव देणे महत्त्वाचे आहे. तसे पाहिले १९ वे व २० वे शतक महिलांच्या कर्तुत्वाला वाव मिळवण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. या काळात भारतातील महिलांच्या जीवनात अनेक अमुलाग्र बदल घडून आले आहेत. महिलांचे व्यक्तिमत्व बदलले. सामाजिक, सांस्कृतिक कौटुंबिक अस्तित्व अर्थपूर्ण बनले. समाजाचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ लागला. महिलांना स्वातंत्र्य मिळाल्याची जाणीव होऊन आपापल्या क्षमता ओळखून विविध क्षेत्रात संधी शोधून पदार्पण केले. एकेकाळी रूढी, प्रथा, परंपरा यांच्यात अटकलेल्या महिलांनी संधी मिळताच आपल्या क्षमता सिद्ध करून समाजाला दाखवलेले आहे.
भारतात सन १९७० पासून महिलांनी उद्योग क्षेत्रात प्रवेश केला असला तरी त्याचे प्रमाण नगण्य होते. १९७५ नंतर सरकारी धोरणात मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्यामुळे महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली. १९८० नंतरच्या काळात महिलांचा उद्योग क्षेत्रातील सहभाग जास्त प्रमाणात दिसू लागला. आज लघुउद्योग क्षेत्रात महिला उद्योजकांची संख्या १,०६,७२१ (१०.११ टक्के) आहे. या सर्व महिला उद्योग क्षेत्राशी संबंधित आहेत. त्यापैकी १३ टक्के महिला लघुउद्योग क्षेत्रात नोंदणीकृत आहेत आणि उर्वरित ८७ टक्के अनोंदणीकृत आहेत.