निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या सामाजिक कविता
DOI:
https://doi.org/10.7492/bc1rc103Keywords:
सामाजिक आशय, समाजवास्तव, मानवी समाज, संस्कृतीAbstract
साहित्य आणि समाज यांचा संबंध अनन्यसाधारण आहे. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब आहे. समाजाशी असणारे ऋणानुबंध साहित्यात आपणास पहावयास मिळते. माणसाला घडविण्याचे कार्य साहित्य करते. मानवी भावभावना,संवेदना, सुखदुःख यांची गुंफण आपण साहित्यात अनुभवत असतो. जीवनातील संघर्षाला उभी ठाकणारी व दुःखाच्या डोंगराला हसत पार करणारी, आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करून अगदी साध्या भाषेत तत्त्वज्ञानाची व्याप्ती सांगणारी अशी ही बहिणाई. मराठी साहित्यात निसर्गकन्या, भूमीकन्या या नावाने नावलौकिक पावलेली 'बहिणाबाई चौधरी' या आपल्या कवितांनी अजरामर झालेल्या आहेत. एखाद्या शिक्षित महिलेने यशाचे उंच शिखर गाठणे हे निर्विवाद, पण अक्षराची ओळख नसलेल्या महिलेला साहित्यात नावलौकिक मिळणे म्हणजे अशक्यप्राय काम होय. निरक्षित महिलेने अक्षराचा मळा फुलवून त्यात काव्याचे पीक काढले व समाज, संस्कृती, तत्त्वज्ञान या तिन्ही गोष्टींचा मेळ घालून साध्या-सोप्या बोली भाषेचा वापर करून मराठी साहित्यात मानाचा तुरा मिळविला. ‘कलावंत हा जन्मावाच लागतो, तो बनविता येत नाही’ या उक्तीचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बहिणाबाई.साध्या, सोप्या भाषेत जीवनाचा अर्थ त्यांनी समजावून सांगितला. त्यांच्या कविता ह्या सहज फुलून जातात.