सावित्रीबाईंची साहित्य साधना
DOI:
https://doi.org/10.7492/qt9w3d47Abstract
स्त्री-मुक्तीच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचे साहित्य म्हणजे एकोणविसाव्या शतकाचा इतिहास आहे. 19 व्या शतकातील स्त्री-रत्न असलेल्या सावित्रीबाईनी कृतिशील समाजसुधारक जोतिराव फुले यांच्या कार्यात स्वतःला झोकून देऊन त्यांच्या कार्यातूनच प्रेरणा घेऊन स्वतः साहित्य निर्मिती केली.
सावित्रीबाई हया एक स्वतंत्र प्रज्ञेच्या कवयित्री होत्या. सामाजिक अन्यायाची जाणीव काव्यातून व्यक्त करणारी त्या काळातील सावित्रीबाई ही पहिलीच कवयित्री होय. कारण वैयक्तिक सुखदुःखे, वात्सल्य, पतिप्रेम, मातृप्रेम ज्यात व्यक्त होते अशी स्त्री गीते त्या काळात खूप लिहिली गेली. परंतु समाज उन्नतीचे कार्य एक व्रत म्हणून स्विकारलेल्या सावित्रीबाईंनी एका प्रखर निष्ठेने नव्या क्रांतिकारी विचारधारेने आपले लेखन केले. त्यामुळे आधुनिक काळातील एक बंडखोर लेखिका म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. निसर्गातील पाखरांना, फुलांना मनसोक्त जगण्याचा जसा निसर्गदत्त अधिकार आहे तसे जगणे समाजात स्त्रीला लाभावे ही प्रामाणिक भावना त्यांच्या लेखनामागे होती. समग्र स्त्रीवर्गाची परंपरागत दास्यातून मुक्ती व्हावी, स्त्री जगण्याच्या संघर्षात कुठेतरी ठामपणे उभी रहावी ही मूलभूत अपेक्षा सावित्रीबाईंनी लेखनी हातात धरताना बाळगली होती. जोतिरावांची शिष्या अर्धांगिणी, आद्य शिक्षिका असलेल्या सावित्रीबाईंच्या लेखनावर मात्र प्रस्थापित साहित्यिकांकडून उपेक्षेचा पडदा पडला. यामागील कारण असेही असू शकते की, कदाचित जाग्या झालेल्या स्त्री मनाच्या स्वाभिमानी हुंकाराने पुरूषांच्या अंकित राहिलेली स्त्री बड करून उठेल व फुकटचे गुलाम म्हणून राबवायला मिळणारी स्त्री स्वातंत्र्याची मागणी करील. पुरूषच काय परंतु ज्यांच्यासाठी सावित्रीबाई हयातभर झगडल्या त्या स्त्रियांना सुध्दा सावित्रीबाईंची ओळख अजून पूरतेपणी झालेली नाही ही शोकांतिका आहे.
सवित्रीबाईंच्या साहित्य लेखनाचा केंद्रबिंदू सामान्यांना ज्ञानाची दारे उघडी करून त्यांचे जीवनमान सुधारणे हा होता. सामान्यांच्या जगण्याचे चित्रण साहित्यात आल्याशिवाय तळागळातील माणूस जागा होणार नाही याची सावित्रीबाईंना पूरेपूर जाणीव होती आणि तसा आंतरिक आत्मविश्वास होता. सावित्रीबाईंनी फक्त कवयित्री म्हणून आपले काव्य लेखन केलेले नाही. कारण त्यांच्यामागे सामाजिक कार्याचा प्रचंड व्याप होता. कारण त्या मुळात समाजक्रांतिकारक होत्या. आपले सामाजिक कार्य करता करता आपल्या समाजाबांधवांना काही सांगावे. त्यांच्या पर्यंत प्रबोधन न्यावे या आशेने त्यांनी कविता रचल्या. त्यांनी आपले कार्य लेखणी व कृतीतून लोकांपर्यंत पोहोचविले.
सावित्रीबाईंचे जीवन व कर्तृत्व हे, स्त्री ही स्वतंत्र बाण्याची व कर्तव्यदक्ष निर्माण व्हावी यासाठीच वाहिलेले होते. स्त्रीदास्यमुक्ती व स्त्रियांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व या दृष्टीने सावित्रीबाईंनी केलेले लिखाण हे स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या इतिहासात सुरूवातीचे लिखाण म्हणून सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे.