कृषीक्षेत्रातील महिलांच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/rvf7vt60Abstract
शेतीचा शोध महिलांनी लावला आहे. प्राचीन काळापासून मानवी इतिहासात महिलांचा कृषी क्षेत्रात सहभाग आढळून येतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेत महिलांचे स्थान अतिशय महत्त्वाचे असून, शेतीव्यवसायात महिला मोठ्या संख्येने आहेत. हा व्यवसाय योग्य पद्धतीने त्या करताना दिसून येतात. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. हे असंघटित क्षेत्र म्हणून ओळखले जाते. ग्रामीण भागातील लोकांच्या उदरनिर्वाहाचे शेती हे प्रमुख साधन असून, अधिकाधिक लोक शेती व्यवसाय करतात. जास्तीत जास्त महिला शेतकरी किंवा शेतमजूर म्हणून काम करतात. 80% महिला शेती व्यवसायात आहेत.
पारंपरिक समाजव्यवस्थेत स्त्रीला असलेल्या स्थानाचा विचार करता असे दिसून येते की, पुरुषप्रधान संस्कृतीने स्त्रियांचे विविध पातळ्यावर शोषण केले आहे. परंपरेने तिला अबला हे विशेषण लावले आहे. "चूल आणि मूल" हेच तिचे आयुष्यभराचे कार्यक्षेत्र तिच्याकडे पहात असताना तिला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते. पुरुषाशिवाय तिला पूर्णत्व येऊ शकत नाही, हे तिच्या मनावर वारंवार बिंबविले जाते. यासाठी पुरूषप्रधान संस्कृतीने धार्मिक ग्रंथांचा आधार घेतला. त्या ग्रंथांचे लेखनही पुरुषांनी त्यांच्या सोयीप्रमाणे केले. त्यात विविध युक्त्या वापरण्यात आल्या. धार्मिक ग्रंथांमध्ये स्त्रीला सहनशील, सोशिक, ममतेचा सागर अशा रीतीने स्त्रीला दर्शविले गेले. पुरुषप्रधान संस्कृतीच्या जोखडात स्त्री दबतच गेली आणि स्वत:चा आवाज व स्वातंत्र्य हिरावून बसली. महिलांना धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक बाबतीत दुय्यम दर्जा दिला जातो. कृषी क्षेत्रातही महिलांना समान वागणूक दिली जात नाही.