नजुबाई गावीत यांच्या कादंबरीतील भाषाशैली
DOI:
https://doi.org/10.7492/w9ckvz33Abstract
आदिवासी साहित्यविश्वात अतिशय सशक्त आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक म्हणून नजूबाई गावीत यांचे नाव घ्यावे लागते. त्यांनी आदिवासी, भूमिहीन, शेतकरी, धरणग्रस्त इत्यादींच्या लढ्यात सहभाग घेणाऱ्या आदिवासी समाजातील लढवय्या कार्यकर्त्या आहे. त्यांचा जन्म १० जानेवारी १९५० रोजी धुळे जिल्ह्यातील आदिवासी व भूमिहीन कष्टकरी कुटुंबात झाला. नजुबाईंना लहानपणापासूनच दारिद्य्राशी सामना करावा लागला. आदिवासी समाजाची भयानक पिळवणूक होत आहे हे त्यांना कळले. त्यांनी १९७२ मध्ये चळवळीत स्वत:ला झोकून दिले. चळवळ चालवायची असेल तर राजकीय पक्षाचे पाठबळ मिळायला हवे, या हेतूने त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल झाल्या. यातूनच धुळे येथे श्रमिक महिला सभेची स्थापना त्यांनी केली. पुढे ‘सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षा’तून अनेक लढे त्यांनी दिले. वनजमीन हक्काचा लढा उभारण्यात त्या पुढे होत्या. एक गाव एक पाणवठा, विषमता निर्मूलन यांसारख्या अनेक सामाजिक चळवळींमध्ये नजुबाई गावीत हिरिरीने पुढे होत्या. सामाजिक प्रश्नांवर संघर्ष करतानाच त्यांनी आदिवासींच्या व्यथा मांडणारे लेखनही केले. त्यांनी 'आदोर' हे आत्मकथनाच्या रुपात सुरुवातीला प्रसिद्ध झाले होते. परंतु नंतर 'तृष्णा' या आत्मवृत्तपर कादंबरीमध्ये त्याचा समावेश केला आहे. नजुबाई गावीत यांची 'तृष्णा' ही कादंबरी १९९५ साली सत्यशोधक मार्क्सवादी प्रकाशन, धुळे या संस्थेने प्रकाशित केली. ती एक आत्मवृत्तपर कादंबरी असून, या कादंबरीचे चार विभाग केले आहेत. त्यामुळे चार खंडात ही कादंबरी विभागली गेली आहे. आदोर, रोप, रोपणी, पोराळी हे चार खंड आहेत. 'आमचा प्राथमिक साम्यवादी आदिवासी पूर्वज' अशी एक लोककथा कादंबरीच्या आरंभीच आली आहे. आदिवासी गरीब का झाले, हे ती लोककथा सांगते. मावची आणि भिल्ल जमातीतील पात्रांभोवती कादंबरी फिरताना दिसते. बोढरीपाडा हे दाट जंगलाने वेढलेले भिल्ल मावची आदिवासींचे गाव, तिथले लोकजीवन, लोकरूढी, लोकभ्रम, लोकाचार, खानपान पद्धती, आंतरिक स्पृश्यास्पृश्य भेदाभेद, बाटल्या वर काढण्याचा विधी, लग्नप्रसंगीचा दहेज प्रथा, दारूत बुडालेल्या सवयी, सण-उत्सवाचा चालणारी धुंद, वृत्ती प्रवृत्तींची परस्परांवर झडप, दैन्य दारिद्रयात घुटमळणारा संसार, आणि पोटासाठी चाललेली वणवण, यांचे सूक्ष्म निरीक्षण नजुबाई गावीत यांनी कादंबरीच्या प्रत्येक पानावर नोंदलेले आहे. तसेच त्यांची दुसरी कादंबरी 'भिवा फरारी' या कादंबरीमध्ये आदिवासी जीवनावर प्रकाश टाकला आहे. ही कादंबरी २००८ साली शिरूर येथील मावळाई प्रकाशन येथून प्रसिद्ध झाली आहे. या कादंबरीमध्ये आदिवासी जमातीचे चित्र रेखाटले गेले आहे. 'भिवा' नावाच्या आदिवासी तरुणाभोवती ही कादंबरी केंद्रित होताना दिसते. इंग्रज, सावकार व जमीनदार यांच्या कचाट्यात सापडलेला आदिवासी हा कादंबरीचा मुख्य विषय आहे. या कादंबरीतील नायक भिवा समाजव्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन संघर्ष करताना दिसतो. त्यातून आदिवासी समाजाची अस्मिता जागृत होते. या कादंबरीतील या नायकाचा हा संघर्ष आदिवासींच्या पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे. अशा दोन महत्त्वपूर्ण कादंबऱ्या लिहून आदिवासी साहित्यात नजूबाई गावीतांनी वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्या कादंबरीची भाषा लक्षात घेत असतांना मानवी जीवन व्यवहारातील भावभावना विचार व्यक्त करण्यासाठी माणूस भाषेचा माध्यम म्हणून उपयोग करतो. कादंबरीतील आशयविश्व कथानकाचे स्वरुप निवेदक व त्याचा दृष्टिकोन त्याची अनुभव घेण्याची पद्धती यावरुन कादंबरीच्या भाषेचे रुप ठरत असते. कादंबरीमधून येणाऱ्या पात्र प्रसंगांना जिवंत काव्याचे सामर्थ्य भाषेमध्ये असावे लागते. कादंबरीतील कथाहेतू, डोळ्यासमोर ठेऊन कादंबरीकार त्या-त्या परिसरातील पात्रांच्या तोंडी ती ती भाषा देत असतो. त्या कादंबरीमधील पात्र कोणत्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करतात. त्यावरुन ती पात्र त्या प्रांतातील भाषेचा अस्सल रुप घेऊन कादंबरी अवतरते. कादंबरीची भाषा आशयपूर्ण व सौंदर्यपूर्ण असावी लागते. त्यासाठी भाषिक अलंकार, प्रतिमा, प्रतिके, म्हणी, वाक्प्रचार यांचा वापर कादंबरीकार करीत असतो.