विहीर जल व्यवस्थापनाचा दीपस्तंभ : एक भौगोलक अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/73dgqr87Abstract
पाणी हे पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक घटकांपैकी एक आहे आणि पाण्यावर प्रवेश हा संयुक्त राष्ट्रांनी मान्य केलेला मानवी हक्क आहे. मराठवाड्यातील विहीर आणि शेती सिंचन हा एक महत्त्वाचा विषय आहे. या भागातील शेती मोठ्या प्रमाणावर विहिरींच्या पाण्यावर अवलंबून आहे. विहिरी मानवी संस्कृतीच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. किमान 8400 बीसी वर्षापासून विहिरी हा पाण्यापर्यंत पोहोचण्याचा एक प्राचीन मार्ग आहे. जो आजही वापरला जातो. समुदायांना एक विश्वासार्ह जलस्रोत प्रदान करण्यासाठी जगभरात विहिरी बांधल्या गेल्या. भारतात महाराजांनी भेट दिलेल्या विहिरींपासून ते गरिबांनी 300 मीटरपेक्षा जास्त खोलीपर्यंत खोदलेल्या विहिरीचा इतिहास आहे.
ऋग्वेदात तसेच रामायण, महाभारत या विख्यात ग्रंथात व निरनिराळ्या पुराणामध्येही जागोजागी विहीरीबद्दल उल्लेख केलेला आढळतो. बायबलमध्ये विहिरीतील पाणी व विहिरींची बांधणी यांसंबधी उल्लेख आढळतात. मोहें-जो-दडो येथे शहरी वस्तीसाठी पक्क्या विटांनी उत्तम तऱ्हेने बांधलेल्या विहिरी तेथील उत्खननात आढळून आल्या आहेत. भूजलाचा उपयोग करण्यासाठी यूरोपमध्ये ११०० च्या सुमारास आघात छिद्रण पद्धतीने विहिरी खणण्यास सुरूवात झाली. काही कारणांमुळे जलाशयापासून लोकांना लांब राहावे लागल्याने पाण्याची गरज भागविण्याकरिता विहीर खणून गरजेप्रमाणे भूमिजल म्हणजे जमिनीतील पाणी मिळविण्याची प्रथा जगभर अतिप्राचीन काळापासून प्रचलित आहे. महाराष्ट्रात बीडची खजाना विहीर, बारामोटेची विहीर म्हणजेच बारा मोटा असलेली विहीर ही एक वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असलेली ऐतिहासिक वास्तू सातारा जिल्ह्यात आहे. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावल्या जात. सुमारे इसवी सन 1719 ते 1724 ह्या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ह्या विहिरीचे बांधकाम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू, म्हणजेच संभाजी महाराजांचे पुत्र, शाहू महाराज ह्यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले.
विहीरी आणि मानवांचा इतिहास हा खूप प्राचीन आहे. वर्तमान काळाची गरज व मानवाच्या भविष्याच्या अस्तित्वासाठी विहिरी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. विहीरी शेतीला सिंचनापुरत्या मर्यादित नाहीत तर जल व्यवस्थापनामधील सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहेत. कारण विहिरीच्या पाणी पातळीवरच पिकाचे नियोजन व जल व्यवस्थापन करणे शक्य आहे.