भारत-पाकिस्तान सिंधू जलवाटप करार : कराराचे सामरिक महत्व
DOI:
https://doi.org/10.7492/pwv01w34Abstract
भारत व पाकिस्तान एकाच भूमीतून निर्माण झालेले दोन देश आहेत. धर्माच्या आधारावर पाकिस्तानची निर्मिती करण्यात आली. भारताला विरोध करणे आणि त्याला अपमानित करण्याचे एकमेव कार्य पाकिस्तान ने केल्याचे भूतकाळातील दाखल्यातून निष्पन्न होते. याव्यतिरिक्त कोणतेही विशिष्ट ध्येय आणि उद्दिष्ट असल्याचे पाकिस्तानच्या निर्मितीवेळी आणि निर्मिती नंतर दिसून येत नाही. १९४७ मध्ये जम्मू आणि काश्मीर संस्थान आपल्या राष्ट्रास जोडण्यासाठी आततायीपणे घुसखोर आणि सैन्य पाठवून तेथे लूट घडवून आणली, ज्यामुळे जम्मू काश्मीर संस्थानने भारताच्या बाजूने कौल देत, भारताची मदत घेतली. तदनंतर असाच निष्फळ प्रयत्न १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये केल्याचे सर्वश्रुत आहे.
भारतास समोरासमोरील लढाईत पराभूत करणे अशक्य असल्याचे निष्पन्न झाल्याने, पाकिस्तानने ऑपरेशन टोपाझ सारखे छुपे युद्ध करण्यास सुरुवात केली. दहशतवाद या भ्याड शस्त्राचा वापर सुरू केला. सोबतच फुटीरवादला खत पाणी देवू केले, परंतू आजपर्यंत त्यात पाकिस्तानला यश मिळालेले नाही. एकीकडे पाकिस्तानच्या भारताविरुद्ध आपल्या कुरापती नियमित सुरू ठेवल्या आहेत, तर दुसरीकडे पाकिस्तानातील आर्थिक स्थिती ही हालाखीची आहे. तेथील पायाभूत सुविधा या तुटपुंज्या आहेत. भारत द्वेषापोटी आर्थिकदृष्ट्या असहनीय अशी स्पर्धा पाकिस्तान करीत आला आहे. यामुळे पाकिस्तान हा कर्जबाजारी देश झाला आहे. असे असले तरी भारताने आपल्या मुल्यांनुसार आणि परराष्ट्र धोरणानुसार वेळोवेळी पाकिस्तानला मदत केली आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दक्षिण आशियातील एकाच राष्ट्रातून वेगळे झालेली दोन राष्ट्रे आहेत. कालांतराने बांग्लादेशामुळे याचे रूपांतर तीन राष्ट्रात झाले आहे. भारताने त्याच्या शेजारील राष्ट्रांशी नेहमीच सहकार्य, मित्रता, सोहार्दाची भूमिका घेतली आहे. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील सिंधू नदी जलवाटप करार हे त्याचेच एक उत्तम उदाहरण घेता येईल.
पृथ्वीवर सर्वप्रथम जीवनाची सुरुवात पाण्यात झाली. जीवांची उत्पत्ती ही पाण्यातूनच झाली. पाण्यातील सजीव नंतर जमिनीवर वावरू लागलेत. या संजीवातील माकडाचे रूपांतर मानवात झाले. मानवाने केलेल्या प्रगतीत पाण्याचे अनन्य साधारण महत्व आहे. मानवी संस्कृती ही नदीच्या किनारी विकसित झाली. यानुसार जगातील अनेक संस्कृती या नदीच्या किनारी विकसित झाल्याचे इतिहासात दिसते. यावरून असे म्हणता येईल की, मानवी विकासात नद्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. एकविसाव्या शतकात पाणी आणि पर्यायाने नद्यांचे महत्व आजही टिकून आहे. आधुनिक काळात पाण्याचे वाढत जाणारे दुर्भिक्षय बघता पाण्याकरीता युद्ध होतील असे म्हटले जाते हे तितकेच योग्य वाटते.