जलव्यवस्थापनाविषयीचे महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार
DOI:
https://doi.org/10.7492/b2kr4r11Abstract
भूपृष्ठावर उपलब्ध असलेल्या पाण्याचे संरक्षण, संवर्धन करणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, पाण्याच्या स्त्रोतांचे सर्व स्तरांना योग्य असे वितरण करणे याला जलव्यवस्थापन असे म्हणतात.
भारतातील वाढत्या लोकसंख्येमुळे जलसंपत्ती व ताण निर्माण होत आहे. पाण्याचा जर का योग्य पद्धतीने वापर केला नाही तर भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. म्हणून पाण्याचा जास्तीत जास्त काटकसरीने व पर्याप्त वापर होणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले जल व्यवस्थापनाविषयीचे विचार महत्त्वाचे ठरतात.
राष्ट्रपिता महात्मा गांधी एक द्रष्टे होते. त्यांनी निसर्गाशी सुसंगत राहण्याच्या तत्त्वावर भर दिला. जल व्यवस्थापना विषयी त्यांचे विचार अनेक दशकांपूर्वी व्यक्त झाले असले तरी आजही ते काळाशी सुसंगत आहेत. जलव्यवस्थापनावरील गांधीजींचे तत्त्वज्ञान ‘साधी राहणी, शाश्वत विकास व सर्व सजीवांचे कल्याण’ या मूल्यांवर आधारीत होते्.
आधुनिक भारताचा पाया भक्कमपणे उभारण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. त्यांचे योगदान देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मार्गदर्शक ठरलेले आहे. डॉ. आंबेडकरांचे जल व्यवस्थापनाविषयीचे विचार खऱ्या अर्थाने दूरदर्शी होते. पूरनियंत्रण, सिंचन, वीज आणि जलवाहतूक प्रदान करतील अशा बहुउद्देशीय प्रकल्पांच्या गरजेवर त्यांनी भर दिला. जलसंसाधनांच्या अतिरिक्त आणि अयोग्य वापरामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आंबेडकरांचे जलव्यवस्थापनाबद्दलचे विचार उपयुक्त ठरतात.