खान्देशातील औद्योगिक वसाहतीतील जलसिंचन सुविधांचे अध्ययन
DOI:
https://doi.org/10.7492/a5rneh59Abstract
महाराष्ट्र राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा – विदर्भ, व उत्तर महाराष्ट्र असे प्रादेशिक विभाग असून यामधील उत्तर महाराष्ट्रातील उत्तरेकडील प्रदेश खान्देश म्हणून ओळखला जातो. अहमदनगर (अहिल्यानगर), जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्याच्या प्रदेशाला उत्तर महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. उत्तर महाराष्ट्रातील वायव्य भागात खान्देश प्रदेशाचे स्थान असून औद्योगिक विकासात आवश्यक घटकांची मुबलक प्रमाणात उपलब्धता असल्यामुळे ह्या भागात कृषी व कृषीमालावर प्रक्रिया करणारे त्याचप्रमाणे इतर उद्योगधंदे विकसित होत आहेत.
तापी नदीच्या खोऱ्यात आढळून येणारी सुपीक गाळाची जमीन, तापी नदी व उपनद्यांवरील धरणातील पाणी, जलसिंचनाची सुविधा, कृषी विकासाला उदा. कापूस, केळी, ऊस, मका मिरची उत्पादनास आवश्यक असलेली भौगोलिक परिस्थिती, स्थानिक व शेजारील बाजारपेठा, खान्देशातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग आणि लोहमार्ग म्हणजे वाहतूक व दळणवळणाच्या सोयीसुविधा, खान्देशातील शैक्षणिक संस्था व कृषी महाविद्यालये यांची संख्या वाढत असून त्यावर आधारित व इतर परस्परपूरक उद्योगांची उत्तर महाराष्ट्रात स्थापना होत आहे. खान्देशच्या उत्तरेला सातपुडा पर्वत व मोर, अनेर, नर्मदा यांसारख्या नद्यांच्या भौगोलिक सीमा आहेत तर दक्षिणेला अजिंठा, सातमाळा व गाळणा डोंगराच्या रांगा आहेत. उर्वरित दिशांना भू-सीमा आहेत.
औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन हे अनेक घटकांवरती अवलंबून असते. त्यामध्ये पाणीपुरवठा ह्या घटकाला अधिक महत्व आहे. औद्योगिक क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा हा निसर्गावर अवलंबून आहे. सातत्याने बदलते हवामान, ‘ग्लोबल वॉर्मिंग’ ची समस्या अशा अनेक कारणांमुळे औद्योगिक उत्पादनात अनियमितपणा निर्माण झालेला दिसून येतो. महाराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्राला विहिरी, नद्या, कालवे, कुपनलिका इ. मार्गाने पाणीपुरवठा होतो. महाराष्ट्रात सध्या ५५% जलसिंचन हे विहीरींवर अवलंबून असून ४५% जलसिंचन नद्या व कालव्यांद्वारे होते. नैसर्गिक पाणीपुरवठयाच्या साधनातून व जलसाठयातून प्रथम पिण्यासाठी, कृषीसाठी व नंतर उद्योगासाठी पाण्याचे वितरण केले जाते. खान्देश हा नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध असून जल सिंचनाची जोड मिळाल्याने औद्योगिक क्षेत्रात वाढ होत आहे.