श्रीकांत देशमुख यांच्या कवितेतील ग्रामीण जीवनाचे दाहक चित्रण
DOI:
https://doi.org/10.7492/tedm6j35Abstract
श्रीकांत देशमुख हे नव्वोदत्तर ग्रामीण कवितेमधील एक लक्षणीय कवी आहेत. श्रीकांत देशमुख यांच्या ‘बळिवंत’ (१९९७), ‘आषाढमाती’ (२००३) आणि ‘बोलावे ते आम्ही’ (२०१३) या संग्रहातील कविता हे ग्रामीण कवितेतील आधुनिकतावादी संवेदनशीलतेचा एक उग्र आविष्कार आहे. संवेदना संपलेला समाज भयावह असतो तो तसा होऊ न देणे हा साहित्यिकांचा प्रयत्न असतो. यांची कविता विठ्ठल आणि पंढरपुरातल्या असंख्य प्रतिमांनी व्यापलेली आहे. ज्याप्रमाणे ज्ञानोबा, तुकोबा या संतांनी आपल्या अभंगांमधून विद्रोह मांडला, तसाच विद्रोह कवी आधुनिक जाणीवे द्वारे मांडत आहेत. कवीने ग्रामीण भागाचे प्रणय - शृंगार आणि रम्य निसर्ग चित्रण न करता कवीने प्रखर वास्तवाचे दाहक चित्रण केले आहे. त्यांच्या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता, अभंग, कृषी जनव्यवस्थेविषयी काही मांडू इच्छिते. ग्रामीण जीवनाचा ऱ्हास आणि विनाश आणि त्याची शिकार झालेल्या शेतकऱ्याच्या उध्वस्त जीवनाचे चित्रण यांच्या कवितेत मध्यवर्ती आहे. मोडका गावगाडा, बिन बैलाची तुटलेली गाडी, पडके देऊळ, ढासळती शाळा, रक्ताने माखलेले शेत, आटलेले तळे, पाखरासारखा माळ,कुजलेले दाणे आणि वाळलेली पाने,तुटक्या खाटेवरची मरणारी म्हातारी आणि चुलीतली राख आणि निखारे सावरत बसलेली रांडव बाई इ. गोष्टी त्यांच्या कवितेत येतात.