प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीव जागृतीच्या अभ्यासात शिक्षकांचा सहभाग
DOI:
https://doi.org/10.7492/q51ftw40Abstract
प्राथमिक शिक्षण हा व्यक्तिमत्त्व विकासाचा पाया मानला जातो. या टप्प्यात विद्यार्थ्यांच्या विचारसरणी, मूल्ये, वर्तन व सामाजिक जाणीव यांचे संवर्धन घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. समाजाशी निगडित असलेल्या विविध घटकांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित नसून, प्रत्यक्ष अध्यापन-शिक्षण प्रक्रियेतून, सहशालेय उपक्रमांतून तसेच शिक्षकांच्या वैयक्तिक आचरणातूनही साध्य होते. या पार्श्वभूमीवर सदर संशोधन निबंधाचा उद्देश प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणीव जागृतीच्या अभ्यासात शिक्षकांचा सहभाग शोधून काढणे हा आहे. या शोध निबंधात सामाजिक जाणीव या संकल्पनेचा अर्थ विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्ये, जबाबदारी, सहकार्य, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, स्त्री-पुरुष समानता, लोकशाही मूल्ये, तसेच नैतिक व मानवी मूल्यांची जाण निर्माण करणे असा घेतला आहे. शिक्षक या जाणीवेच्या घडणीसाठी अध्यापनात विविध तंत्रांचा वापर करतात. गटचर्चा, गोष्टी सांगणे, भूमिकानाट्य, प्रत्यक्ष कृती उपक्रम, समाजोपयोगी कामे, राष्ट्रीय सणांचे आयोजन, स्थानिक समस्यांवर चर्चा, तसेच शाळा व समाज यामधील सुसंवाद वाढविण्यासाठी शिक्षकांची सक्रिय भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.