आदिवासी विद्यार्थ्यांचा भाषिक कौशल्य विकास: शैक्षणिक आणि सामाजिक परिप्रेक्ष
DOI:
https://doi.org/10.7492/npw73e70Abstract
भाषा ही मानवी जीवनातील संवाद, शिक्षण, संस्कार व सामाजिक सहभागाचे मूलभूत साधन आहे. कोणत्याही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीत आणि व्यक्तिमत्व घडणीत भाषिक कौशल्याचा मोठा वाटा असतो. विशेषतः ऐकणे, बोलणे, वाचन व लेखन ही चारही कौशल्ये सक्षम असतील तरच विद्यार्थी आपले विचार स्पष्टपणे मांडू शकतो व ज्ञान आत्मसात करू शकतो. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांसाठी ही गरज अधिक महत्त्वाची ठरते. कारण त्यांच्या घरी व समाजात वापरली जाणारी भाषा बहुधा बोली स्वरूपातील असते; तर शाळेत शिकवली जाणारी भाषा प्रादेशिक किंवा राष्ट्रीय असते. या दोन भाषांतील दरीमुळे आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रक्रियेत अडथळे येतात. शैक्षणिक परिप्रेक्षातून पाहता, भाषिक कौशल्य कमी असल्यास विद्यार्थ्यांची शिकण्याची गती मंदावते, संकल्पना नीट समजत नाहीत आणि परीक्षेत गुण कमी येतात. शिक्षकांनी दिलेल्या सूचना किंवा पुस्तकातील माहिती पूर्णपणे न समजल्याने ते मागे पडतात. परिणामी शाळा सोडण्याचे प्रमाणही वाढते. म्हणून शैक्षणिक स्तरावर आदिवासी विद्यार्थ्यांना भाषिक आधार देणे आवश्यक आहे. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण, पूल भाषेचा वापर, वाचन व लेखनातील सराव व डिजिटल साधनांचा उपयोग यांद्वारे त्यांची भाषिक प्रगती साधता येते. सामाजिक परिप्रेक्षातून पाहिले तर भाषिक कौशल्यामुळे व्यक्ती समाजात आपले स्थान निर्माण करू शकते. आदिवासी विद्यार्थ्यांना संवादात संकोच जाणवतो, आत्मविश्वास कमी पडतो आणि मुख्य प्रवाहाशी जोडले जाणे कठीण होते. भाषिक कौशल्य विकसित झाल्यास ते रोजगार संधींचा लाभ घेऊ शकतात, स्पर्धात्मक परीक्षांत उतरू शकतात आणि समाजाच्या प्रगत प्रवाहात सहभागी होऊ शकतात. भाषा ही केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसून सामाजिक न्याय, समानता व स्वाभिमानासाठीही आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल अॅप्लिकेशन, ऑनलाईन शिक्षण साधने, सोशल मिडिया यांचा उपयोग करून आदिवासी विद्यार्थ्यांचा भाषिक विकास घडवता येतो. संवादात्मक पद्धती, व्हिडिओ, क्विझ, ऑडिओ स्टोरीज यांसारख्या साधनांनी भाषिक कौशल्य आत्मसात करणे सोपे होते. या प्रक्रियेत शिक्षक, पालक व समाज यांचा सक्रिय सहभाग गरजेचा आहे. एकंदरीत, आदिवासी विद्यार्थ्यांचा भाषिक कौशल्य विकास हा शैक्षणिक प्रगतीसोबत सामाजिक सक्षमीकरणासाठीही आवश्यक आहे. भाषिक कौशल्याच्या आधारावरच ते ज्ञानाच्या प्रवाहात सामील होऊ शकतात आणि समाजात आपली ओळख दृढ करू शकतात. त्यामुळे शैक्षणिक धोरणे, अध्यापन पद्धती आणि सामाजिक उपक्रम यांमध्ये भाषिक कौशल्य विकासाला केंद्रस्थानी स्थान देणे हे आजच्या काळाचे महत्त्वाचे भान आहे.