प्राथमिक स्तरावरील इंग्रजी भाषा कौशल्य विकासासाठी ज्ञानरचनावादी अध्यापन पद्धतीच्या परिणामाचा अभ्यास
DOI:
https://doi.org/10.7492/b01xj291Abstract
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 नुसार इंग्रजी विषय हा प्राथमिक स्तरावर अध्यापन केला जात नव्हता. इंग्रजी विषय हा इयत्ता पाचवी पासून म्हणजेच माध्यमिक स्तरापासून अध्यापन केला जात होता. मात्र काळानुरूप इंग्रजी भाषेचे वाढत जाणारे महत्त्व पाहून त्याचे अभ्यासक्रमात देखील महत्त्व वाढत गेले. इंग्रजी ही एक ग्लोबल भाषा असून ती जगातील ज्ञानाची देवाण-घेवाण करणारी प्रमुख भाषा आहे. संपूर्ण तंत्रज्ञान हे इंग्रजी भाषेतूनच अवगत होते. या सर्व गोष्टी लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला व डिसेंबर 2000 पासून इंग्रजी भाषेचा परिचय प्राथमिक स्तर इयत्ता पहिली पासूनच करून देण्याचे ठरवले. अशाप्रकारे इंग्रजी भाषेचा प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमात इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गात समावेश करण्यात आला. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी भाषा ही संपूर्णपणे अनोळखी भाषा असते. म्हणून अभ्यासक्रम हा विद्यार्थी केंद्रित आणि विद्यार्थ्यांना सहज जमेल असा तयार करण्यात आला. इंग्रजी भाषेचा अभ्यासक्रम हा कौशल्यांवर आधारित आहे. यात भाषेच्या कौशल्य अध्ययनाला अत्यंत महत्त्व देण्यात आले आहे. भाषेची कौशल्य म्हणजे श्रवण, भाषण, वाचन, लेखन आणि संभाषण होत. ही कौशल्य वर्गातून व्यवस्थित साध्य व्हावीत म्हणून प्रत्यक्ष अभ्यासक्रमाचे अध्यापन सुरू करण्याआधी शासनाकडून शिक्षकांना ट्रेनिंग देण्यात आले आहे. त्यांना विद्यार्थी केंद्रीत अध्यापन कसे करावे याविषयी विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. अभ्यासक्रमात श्रवण, भाषण, वाचन, लेखन व संभाषण अशा कौशल्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.